मंगळवेढा पोलीस प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने त्या वृध्देची पोलीस अधिक्षकाकडे धाव...
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मंगळवेढा शहरालगत असलेल्या चोखामेळानगर मधील एका 64 वर्षीय वृध्द आईस चक्क मुलाने व सुनेने घरजागा नावे करण्याच्या कारणावरुन घराबाहेर जबरदस्तीने ओढून बाहेर काढल्याने त्या वृध्द महिलेने न्यायासाठी सोलापूरचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे लेखी तक्रार करुन न्याय मागीतला आहे. दरम्यान मंगळवेढा पोलीसाकडे न्याय मागीतला मात्र सदर वृध्द महिलेस येथे कोणताही न्याय न मिळाल्याने त्या वृध्देस न्यायासाठी वरिष्ठाकडे धाव घेण्याची वेळ आली आहे.
या घटनेची हकीकत अशी,सुरेखा सिद्राम नवगिरे (वय 64,रा.चोखामेळानगर) येथील रहिवासी असून 34/अ/74/1 ही घरजागा सदर वृध्देच्या नावे असून तिच्या पतीचे जुलै 2016 मध्ये निधन झाले आहे. या वृध्देस मुलगा प्रशांत सिद्राम नवगिरे व सुन सरुबाई प्रशांत नवगिरे असे कुटूंबात रहावयास होते. मुलगा एकटाच असल्यामुळे सुरळीत संसार सुरु होता.
मात्र दि.10 जानेवारी 2026 रोजी मुलगा व सुनेने ही घरजागा मुलाच्या नावे कर असा अट्टाहास धरला,मात्र ती जागा नावे न केल्यामुळे चक्क मुलाने व सुनेने आजीच्या हातास धरुन ढकलत घराबाहेर काढले. एकीकडे समाजात मुल असावी म्हणून देवाला नवस बोलले जाते येथे मात्र त्या उलट परिस्थिती पहावयास मिळत आहे. वृध्द आईस मुलाने संभाळणे ही नैतिक जबाबदारी असताना याला तिलांजली देत वृध्देस घराबाहेर काढल्याने संताप व्यक्त होत आहे.
आज ही वृध्द महिला गेली तीन महिने जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेवून राहत आहे. या आजीला बी. पी व शुगरचा त्रास असल्यामुळे तिला जीवन जगणे मुश्किल बनले आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना प्रत्यक्ष भेटून या आजीने न्याय मागितला मात्र या अधिकार्याला त्या आजीची कीव न आल्यामुळे अद्याप तरी त्यांच्याकडून न्याय मिळाला नसल्यामुळे त्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुलाबाबत पोलीसात दोन अदखलपात्र गुन्हे दाखल करुनही तपासिक अमंलदार कृष्णा जाधव यांनीही दखल न घेतल्यामुळे येथील पोलीस प्रशासनाचा कारभार चव्हाटयावर आला असून येथे न्याय गोरगरीबांना मिळत नसल्याचे लक्षात येताच सदर वृध्द महिलेने पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे धाव घेतली आहे.
एस.पी. अतुल कुलकर्णी यांच्या सहाय्यकाने तात्काळ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना कॉल करुन वृध्द महिलेस न्याय देण्याच्या सुचना करुनही अद्यापही अधिकार्यांचे न्यायासाठी डोळे उघडले नसल्याचे सांगण्यात आले. या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री,आय.जी.कोल्हापूर परिक्षेत्र,जिल्हाधिकारी सोलापूर आदींना देण्यात आल्या आहेत.