मंगळवेढ्यासह ग्रामीण रुग्णांची सोलापूर-पुणे-मुंबई धावाधाव थांबविण्यासाठी तालुका स्तरावर उपचार सुविधा आवश्यक...
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर ‘डे-केअर कॅन्सर सेंटर’ सुरू करण्यात यावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य विनायक यादव यांनी केली आहे. ग्रामीण भागातील कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी सोलापूर, पुणे व मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे जावे लागत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आर्थिक व मानसिक ताण येत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात ‘डे-केअर कॅन्सर सेंटर’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्ह्याबाहेर जाऊन उपचार घ्यावे लागणार नाहीत.
त्यामुळे जिल्हा रुग्णालय मुख्य उपचार केंद्र मानून सर्व तालुका रुग्णालयांना त्याची संलग्न उपकेंद्रे म्हणून विकसित करून तेथे ‘डे-केअर कॅन्सर सेंटर’ सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे यादव यांनी नमूद केले. मंगळवेढा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक कॅन्सर रुग्णांना दरवर्षी उपचारासाठी सोलापूर, पुणे किंवा मुंबई येथे जावे लागते. प्रवास, निवास आणि औषधोपचाराचा वाढता खर्च परवडत नसल्याने अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. त्यामुळे तालुका स्तरावरच कर्करोग तपासणी, औषधोपचार व डे-केअर उपचार सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच राष्ट्रीय निःशुल्क औषध योजनेअंतर्गत कर्करोगावरील महागडी औषधे, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर तालुका रुग्णालयात उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी आ समाधान आवताडे यांच्याकडे केली. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांवर उपचारासाठी शेती किंवा मालमत्ता विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी आरोग्य सेवा आणि आर्थिक मदतीची मजबूत यंत्रणा उभारणे अत्यंत गरजेचे असल्याचेही विनायक यादव यांनी अधोरेखित केले.
अगदी बरोबर आहे.
उत्तर द्याहटवा