उद्या पथके मतदान केंद्रावर रवाना होणार...
मतदानासाठी लागणार एकूण 189 CU व BU
मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 आता अंतिम टप्प्यात आली असून या निवडणुकीसाठी मंगळवेढा स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे.सर्व मतदान पथके उद्या म्हणजेच दिनांक 6 रोजी मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत.
मंगळवेढा तालुक्यात एकूण 4 जिल्हा परिषद गट असून 8 पंचायत समिती गण आहेत. तालुक्यात एकूण 189 मतदान केंद्र असून सर्व मतदान केंद्र मतदान प्रक्रियेसाठी सज्ज करण्यात आली आहेत.
मतदान घेण्यासाठी सर्व केंद्र मिळून एकूण 1264 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून एकूण 217 पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
यामध्ये केंद्राध्यक्ष 217, मतदान अधिकारी क्रमांक 1- 217, मतदान अधिकारी क्रमांक 2- 217, मतदान अधिकारी क्रमांक 3- 217, केंद्रावरील पोलीस कर्मचारी - 189,
शिपाई - 207 अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सर्व मतदान पथकांना शुक्रवार दिनांक 6 रोजी सकाळी 8 वाजता शासकीय धान्य गोदाम मंगळवेढा येथे राहण्यास कळवले असून जे कर्मचारी गैरहजर राहतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
शासकीय धान्य गोदाम मंगळवेढा येथून सर्व कर्मचाऱ्यांना मशीन व साहित्य वितरण केले जाणार असून त्यासाठी एकूण 16 टेबल वरून 135 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून साहित्य वितरण केले जाणार आहे.
मतदान पथकांना केंद्रावर घेऊन एकूण 24 एस टी बसेस व 3 क्रूझरची सोय करण्यात आली आहे. तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी 16 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंगळवेढा तालुक्यासाठी एकूण 16 क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मदतीला आणखी 16 सहायक क्षेत्रीय अधिकारी असतील.
मतदानासाठी केंद्रावरील एकूण 189 CU व 189 BU तयार करण्यात आले असून त्या व्यतिरिक्त 25 राखीव CU व 25 राखीव BU तयार करण्यात आले आहेत.
नागणेवाडी येथील नानासाहेब प्रशाला येथील मतदान केंद्र क्रमांक 105/16 या ठिकाणी 'सखी मतदान केंद्र' तयार करण्यात आले असून या ठिकाणी केंद्राचा संपूर्ण कारभार महिला कर्मचारी सांभाळणार आहेत.
त्याचबरोबर मरवडे येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा येथे मतदान केंद्र क्रमांक 108/16 याठिकाणी 'आदर्श मतदान केंद्र' तयार करण्यात आले आहे.
मतदान दिवशी मतदारांना केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असून मोबाईल जवळ आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
तालुक्याती संवेदनशील केंद्राची नोंद नसून कोणत्याही केंद्रावर कायदा सुव्यवस्था स्थिती अबाधित रहावी यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवेढा तालुक्यासाठी अपर जिल्हाधिकारी राहुल पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते विविध मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत.
मतदान दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार असून या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने निष्पक्ष व निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी केले आहे.
------------------------------------------------------------------------
कोट :-
मतदार आता वापरणार "मताधिकार" राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना आपले मतदार यादीतील नाव शोधणे सोयीस्कर व्हावे यासाठी नव्याने "मताधिकार" हे मोबाईल ऍप तयार केले असून ते प्ले स्टोर वर उपलब्ध आहे.