पास घरी विसरल्यामुळे चक्क एस.टी.च्या कंडक्टरने हायवेवर निर्मनुष्य ठिकाणी उतरवले ;मंगळवेढा आगाराची एसटीतील माणुसकी हादरवणारी घटना...

पास घरी विसरल्यामुळे चक्क एस.टी.च्या कंडक्टरने हायवेवर निर्मनुष्य ठिकाणी उतरवले...

मंगळवेढा आगाराची एसटीतील माणुसकी हादरवणारी घटना...

मंगळवेढा /प्रतिनिधी :- 

काका,पास घरी राहिला आहे.माझ्या पप्पांना फोन करा ते पैसे देतील अशी कळकळीची विनंती करत असलेल्या पाचवी वर्गात शिकणाऱ्या ऐका चिमुकल्याला एसटीचा पास विसरल्याने चक्क त्याला निर्मनुष्य ठिकाणी उतरवण्याचा महाप्रताप मंगळवेढा आगाराच्या कंडक्टरने केल्याचा प्रकार असून या घटनेची चौकशी करून संबधीत कंडक्टवर निलंबना सारखी कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.

ब्रम्हपुरी येथील प्रथमेश राहुल पाटील हा पाचवीतील विद्यार्थी रोज शिक्षणासाठी मंगळवेढ्याला ये- जा करतो. शनिवारी नेहमीप्रमाणे तो ब्रह्मपुरीहून मंगळवेढा आगाराची सोलापूर-मंगळवेढा (बस क्रमाक ९४०५) या एसटीने प्रवास करत होता. ब्रह्मपुरीपासून ७ कि.मी. अंतरावर बस आल्यानंतर वाहक तिकीट काढण्यासाठी आले.यावेळी प्रथमेशने बॅगमध्ये पास शोधला असता,तो चुकून घरी राहिल्याचे लक्षात आले. घाबरलेल्या आवाजात त्याने वडिलांना फोन करण्याची विनंती केली. 'पप्पा पैसे देतील,' असे तो वारंवार सांगत होता. 

मात्र त्या निरागस शब्दांनाही वाहकाने किंमत दिली नाही. क्षणाचाही विचार न करता बसचा दरवाजा उघडून त्या चिमुकल्याला थेट मानववस्ती नसलेल्या काळ्या शिवारात माणूसकी विसरून त्या वाहकाने थेट खाली उतरवले.पास जवळ नसला तरी ऑडव्हान्स पैसे मुलाने भरलेच होते अशा प्रतिक्रीया या घटनेनंतर पालकांनी व्यक्त केल्या. 

अशा बेजबादार कर्मचाऱ्यामुळे शासनाची एस.टी.मात्र बदनाम होत आहे.अचानक रस्त्यावर सोडल्यामुळे प्रथमेश गोंधळून गेला. डोळ्यात पाणी व मनात भीती आणि आजूबाजूला निर्मनुष्य वस्ती अखेर त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला हात दाखवला. त्या व्यक्तीच्या मदतीने तो कसेबसे घरी पोहोचला घरी आल्यानंतर त्याच्या थरथरत्या आवाजात घडलेला प्रकार ऐकून पालक कुट्ंबीय हादरून गेले. 

या घटनेनंतर पालकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.पास विसरणे ही चूक असू शकते ; पण त्यासाठी लहानग्या विद्यार्थ्याला आडरानात उतरवणे म्हणजे त्याच्या जीवाशी खेळ आहे. असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी पालक राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त, जिल्हा आगार प्रमुख व तालूका आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित वाहकांवर निलंबनाची कारवाईची मागणी केली आहे.

अशा घटनांमुळे संपूर्ण एसटी महामंडळाच्या विश्वासार्हतेचे नुकसान होत आहे.आता केवळ चौकशी नव्हे,तर धडा शिकवणारी कठोर कारवाईच आवश्यक असल्याची तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

दरम्यान,या घटनेची संपूर्ण चौकशी करून सोलापूरच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांना अहवाल पाठवला असल्याचे आगार प्रमूख संजय भोसले यांनी सांगीतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.