मंगळवेढा / प्रतिनिधी :-
महमदाबाद हुन्नूर येथील मरीआई मंदिरामधील ७३ हजार ५०० रुपये किंमतीच्या चांदीच्या मुर्त्या चोरून नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी सुभाष जाधव हे दिनांक १८ डिसेंबर रोजी मरीआई मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेले असता मंदिरामध्ये ७३ हजार ५०० रुपये किमतीच्या चांदीच्या छोट्या छोट्या मुर्त्या दिसून आल्या नाहीत.
सदरचा प्रकार त्यांनी गावातील विठ्ठल जाधव ,दिगंबर जाधव, अशोक जाधव ,तानाजी जाधव यांना सांगितल्यानंतर या सर्वांनी मंदिरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यावर मंदिरात देवीच्या मूर्ती दिसून आल्या नाहीत. परंतु मंदिरात कोणीतरी पूजा केल्याचे तेथे सांडलेल्या हळदी कुंकवावरून स्पष्ट झाले. त्यामुळे कोणीतरी देवीच्या मूर्तीची पूजा करून मुर्त्या नेल्या असतील त्याचबरोबर मरीआई देवी प्रकोप पावते व शाप देते म्हणून मूर्ती नेणारी व्यक्ती मूर्ती परत मंदिरात आणून ठेवेल असे त्यांना वाटल्याने त्यांनी तक्रार देण्यास वेळ झाल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान या चोरीमध्ये २५० ग्रॅम वजनाची चांदीची देवीची मूर्ती, २०० ग्रॅम वजनाचा चांदीचा गाडा, २२५ ग्रॅम वजनाची म्हसोबाची पंचधातूची मूर्ती, १०० ग्रॅम वजनाच्या देवीच्या चपट्या २० मुर्त्या, २५ ग्रॅम वजनाच्या त्यावर सोन्याचा मुलामा दिलेल्या ५ चपट्या मुर्त्या असा एकूण ७३ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या चोरीचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.