मंगळवेढा नगरपरिषद आज मतदान पथके रवाना होणार...
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
मंगळवेढा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून आज मतदान पथके त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर रवाना होतील.
मतदान पथकांमध्ये राखीव सह एकूण 205 कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यात राखीव सह 41 केंद्राध्यक्ष असतील.झोनल अधिकारी राखीव सह 6 असून प्रत्येक केंद्रावर मदतीसाठी 8 मास्टर ट्रेनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगळवेढा नगर परिषद अंतर्गत एकूण 31 मतदान केंद्र असून सर्व केंद्राची तपासणी करण्यात आली आहे.
दिनांक 20 रोजी मतदानाच्या दिवशी सकाळी 6.30 वाजता मतदान प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अभिरुप मतदान (मॉकपोल) घेतला जाणार असून त्यानंतर सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात केली जाईल.
मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कुणालाही प्रचार करता येणार नाही तसेच कोणतेही प्रचार साहित्य घेऊन येता येणार नाही.
सायंकाळी 5.30 वाजता रांगेत उभा असलेल्या सर्वांचे मतदान होईपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.
प्रभाग क्रमांक 9 वगळता इतर सर्व प्रभागात एकच नियंत्रण युनिट व बलेट युनिट राहणार असून प्रभाग क्रमांक 9 मध्ये उमेदवारांची संख्या जास्त असल्याने तिथे 2 बलेट युनिट राहणार आहेत.
या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला एकूण 3 मते द्यायची असून एक मत अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला, दुसरे मत त्या प्रभागातील अ जागेच्या सदस्याला व तिसरे मत त्या प्रभागातील ब जागेच्या सदस्याला द्यावे लागणार आहे. तिसरे मत दिल्यानंतरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
याबाबत जनजागृती करण्यात आली असून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी केले आहे.