निर्भया पथकाची टवाळखोरांनी घेतली धास्ती
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील ढवळस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोलापूर ग्रामीण पोलीस दल व मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या आदेशानुसार मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अमोल राऊत,महिला पोलीस कविता सावंत, सोनाली जुंदळे यांच्या माध्यमातून पोलीस काका,पोलीस दीदी,निर्भया पथक ओळख व समुपदेशन जनजागृती कार्यक्रम करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी पोलीस कॉन्स्टेबल अमोल राऊत साहेब यांचा स्वागत पर सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष बावचे व महिला पोलीस कविता सावंत मॅडम, सोनाली जुंदळे यांचा स्वागत पर सत्कार मनिषा जगताप यांनी केला.
यावेळी अमोल राऊत म्हणाले, किशोरवयीन मुला- मुलींनी मोबाईल सारख्या वस्तूचा अनावश्यक वापर करू नये त्यामधून नकळत तुमच्या हातून गुन्हे घडू शकतात. मोबाईल चा वापर आवश्यक त्या ठिकाणी व योग्य त्या वेळी कारणासाठीच करावा. मुलींनी अथवा मुलांनी होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार पेटीचा वापर करून त्यामध्ये आपल्या तक्रारी अडचणी शिक्षक व निर्भय पथकापर्यंत पोहोचवाव्यात असेही सांगितले.मुलांनी कमी वयात दुचाकी वाहनांचा वापर करू नये.मुलांनी व्यसनापासून दूर रहावे,बाल गुन्हेगारी पासून दूर राहावे. स्वतः सुरक्षित रहावे.पोस्को सारखा कायदा गुगल वर सर्च करून तो जाणून घेत गुन्हेगारी पासून दूर राहावे,मुला-मुलींनी शाळेत अथवा रस्त्याने येत - जात किंवा शाळेत असताना जर एकमेकांना शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असेल तर अशी बाब आपल्या आई- वडील व वर्गशिक्षकांना निदर्शनास आणून दिले पाहिजे,या वयामध्ये चुकीच्या मार्गाने न जाता शिक्षणाकडे लक्ष देऊन स्पर्धा परीक्षेचा आधार घेत सक्षम अधिकारी बनण्याचा संकल्प केला पाहिजे,मुलांना कायद्याची जाणीव निर्माण करून देऊन समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोषक वातावरण निर्माण करणे. बाल सुरक्षा कायदा सर्व मुला- मुलींना लागू पडतो, शालेय शिक्षण घेत असताना आपले पाऊल वाकडे पडणार नाही याची काळजी घेणे गरजेचं आहे. आज महिला घर,शाळा,ऑफिस, रेल्वे, पोलीस अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे महिलांमधील धाडस मोठ्या प्रमाणात वाढत असून ते धाडस प्रेरणादाई असते. यामुळे शालेय व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुली,तसेच महिलांचे संरक्षण आणि त्यांच्या आत्मसन्मानार्थ निर्भया पथक कार्यरत आहे.या पथकाकडून हेल्पलाईन क्रमांक - 112 व निर्भया पथक साठी मोबाईल नंबर 9833312222 सुरू करण्यात आला असून संकटकाळात महिला, विद्यार्थ्यांनींनी पोलिसांशी तात्काळ सदरच्या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन पोलीस निर्भया पथकाच्या वतीने करण्यात आले आहे.
निर्भया पथक महिला पोलीस कविता सावंत यांनी मुलींना विशेष गुड टच व बॅड टच याविषयी प्रात्यक्षिक सविस्तर माहिती दिली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष बावचे,पत्रकार सचिन हेंबाडे,मुख्याध्यापक राजाराम बनसोडे, सहशिक्षक संभाजी सुळकुंडे, विजयसिंह गायकवाड,धनाजी नागणे, नागन्नाथ कोकरे, विष्णू कुंभार, मोहन लेंढवे, मनिषा जगताप, दिगंबर कुचेकर व विध्यार्थी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी सुळकुंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार विजयसिंह गायकवाड यांनी मांडले.