कै.महादेव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यान संपन्न
मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
संत विचारांचा कर्मयोग हा सांप्रदायिक संस्काराचा परिवर्तनशील पाया असल्याचे प्रतिपादन इतिहास अभ्यासक तथा नामांकित व्याख्याते प्रशांत सरूडकर यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा लेबर फेडरेशनचे माजी जेष्ठ संचालक कै.महादेव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित संतांचा कर्मयोग या विषयावर व्याख्यान रूपाने आपले विचार मांडत असताना ते बोलत होते. व्याख्यानाच्या प्रारंभी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे, संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे व उद्योगपती संजय आवताडे, दत्तात्रय जमदाडे यांच्या उपस्थितीमध्ये कै.महादेव बाबुराव आवताडे यांनी प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संत साहित्य अभ्यासक दिगंबर यादव यांनी केले.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संत विचारांचा कर्मयोग आदर्शाच्या रूपाने समोर ठेवून कै महादेव आवताडे यांनी आवताडे परिवाराची सर्वांगीण सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांनी घालून दिलेला सामाजिक सेवेचा आणि मानवतावादी विचारांचा वसा आणि वारसा आजही आवताडे परिवाराच्या माध्यमातून सक्षमपणे पुढे नेत आहेत ही संत विचारांच्या कर्मयोगाची फार मोठी नांदी असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. संत विचारांची महती सांगणाऱ्या या महाराष्ट्र भूमीमध्ये समतेच्या मौलिक मूल्यांना खऱ्या अर्थाने गतिमान करण्याचे अनमोल कार्य देवभूमी पंढरपूर व संतभूमी मंगळवेढा या भागामध्ये झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या व्याख्यानमालेसाठी शहर व तालुक्यातील अनेक रसिक श्रोते, सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यावसायिक कार्यक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. सर्वात शेवटी प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.