मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन संस्थेचे माजी जेष्ठ संचालक कै.महादेव बाबुराव आवताडे यांच्या १९व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील नामांकित इतिहास अभ्यासक तथा प्रसिद्ध व्याख्याते प्रशांत सरूडकर यांचे संतांचा कर्मयोग या विषयावर सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथील प्रांगणात व्याख्यान संपन्न होणार असल्याची माहिती कै.महादेव बाबुराव आवताडे प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात आली आहे.
अनेक संतांच्या पदस्पर्शाने आणि अस्तित्व आणि पुनीत पावन झालेल्या मंगळवेढा संतभूमी व पंढरपूर देवभूमी अशा दुहेरी संत विचारांच्या पवित्र मातीमध्ये संत विचारांचा प्रगल्भ कर्मयोग आपल्या अमोघ वाणी वक्तृत्वाच्या माध्यमातून गुंफण्यासाठी प्रशांत सरूडकर हे मंगळवेढा येथे या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत. आपला पारंपारिक उद्योग- व्यवसाय सांभाळत असताना सार्वजनिक कार्यक्षेत्रातील समाजकारण आणि राजकारणी या सेवाभावी विश्वात माणसांची व तितक्याच तोलामोलाच्या विचारांची पेरणी करून सर्वसामान्यांशी आपली नाळ भक्कम करणारे श्रध्येय कै.महादेव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे व आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा.लि.चेअरमन संजय आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक, धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
तरी नियोजित या व्याख्यानमालेसाठी सर्व रसिक श्रोत्यांनी तसेच मतदारसंघातील ग्रामस्थ नागरिकांनी व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कै.महादेव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानचे संचालक पै.दादासाहेब ओमणे व पुण्यतिथी संयोजन समिती यांनी केले आहे.