मंगळवेढा /प्रतिनिधी :-
सोलापूर जिल्ह्यात थंडीमुळे शेकोट्या पेटत असताना मंगळवेढा तालुक्यातील ढवळस गावात मात्र वेगळ्याच शेकोट्या पेटल्या असून आता महिनाभर या शेकोट्यात ठिकठिकाणी महाराष्ट्रातून जमू लागलेल्या पाहुण्यांची गर्दी दिसू लागली आहे. थंडीच्या या महिन्यात मंगळवेढ्यातील स्पेशल हुरडा पार्ट्यांची चर्चा नेहमीच सर्वत्र असते. त्यातच हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष असल्याने यंदा हुरड्याचा बाज अजूनच वाढला आहे.
हुरडा पार्टी अर्थात निसर्गाच्या सानिध्यात कोवळ्या ज्वारीची कणसे आरावर भाजून त्याचा गरम गरम आस्वाद घेताना सोबत भाजलेले शेंगदाणे, गूळ, काळी चटणी, रानमेवा आणि कुटुंबीय व मित्रजनांची साथ सांगत. यामुळे मंगळवेढ्याच्या या सुप्रसिद्ध हुरड्याची चव कोणत्याही पक्वान्नांना भारी पडते. तसे ज्वारीचे पीक राज्यभरातील अनेक भागात घेतले जाते. मात्र मंगळवेढ्याच्या या ज्वारीची चवच इतकी न्यारी आहे कि ज्यामुळे भारत सरकारने या मंगळवेढ्याच्या ज्वारीला GI मानांकन दिले.
हुरड्याच्या जोडीला रानमेवाही
आज ढवळस येथील पत्रकार सचिन हेंबाडे यांच्या शेतात कोवळ्या मधूर हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी हुरडा पार्ट्याना सुरुवात होऊ लागली आहे. ज्वारीच्या ताटामधून वाट काढत एखाद्या डेरेदार झाडाखाली हुरडा पार्टीसाठी मंडळी जमा होतात. महिला वर्ग घरी बनवलेले काळे तिखट, जवस, शेंगदाणे यांच्या चटण्या, मिरचीचे ठेचे आणि गुळाचे खडे पिशव्यांतून भरून रानात येतात.
तोवर रानात लहानसा खड्डा घेऊन त्यात गोवऱ्या टाकून आर तयार केलेली असते. शेतातून निवडून आणलेली कोवळी कणसे या आरात घालून भाजण्यास सुरुवात होते. मग काहीजण हातावर ही गरम गरम कणसे चोळून हुरडा तयार करतात. मग सुरु होते स्पर्धा कणसे भाजणाऱ्यांत आणि खाणाऱ्यांत. अर्थात यात भाजणाऱ्यांचाच वेग कमी पडत असतो आणि सगळ्यांच्या कडून हुरड्याची मागणी वाढतच जाते. तोंडाला हुरड्याची चव लागल्याने सोबत गूळ आणि चटणीचा आस्वाद घेत प्रत्येक जण आपल्या ताटातील हुरडा फस्त करण्यात गुंतलेला असतो. मग हुरड्याचा जोडीला बोरे , हरभऱ्याचा डहाळा , शेंदाडे असा रानमेवा यायला लागतो.
हुरड्याने संतुष्ट झालेली मंडळी दीपक कोळी, अनिल केदार, कैलास जगताप, महादेव आप्पा हेंबाडे तुकाराम मोरे,विशाल हेंबाडे,सचिन हेंबाडे यांनी या रानमेव्याचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली.