मंगळवेढा /प्रतिनिधी :-
गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जनतेच्या मतदानरुपी आशीर्वादाने या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली असताना हजारो कोटी निधीच्या रूपाने मी संपूर्ण मतदारसंघांमध्ये विकासाच्या रूपाने परिवर्तन करण्याचा मनोदय ठेवून जनतेची सेवा केली आहे. यापुढील काळामध्येही माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने आपण महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाची घोडदौड कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन भाजपा व महायुतीचे विधानसभा उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे.
भाजपा - महायुतीच्या वतीने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार म्हणून आज मान्यवरांच्या उपस्थितीत समाधान आवताडे यांनी युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. तत्पूर्वी आमदार आवताडे यांनी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी भेट देत माजी मंत्री स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करत आशीर्वाद घेतले.
ही उमेदवारी म्हणजे केवळ माझी वैयक्तिक जबाबदारी नसून, आपल्या सर्वांच्या आशा, अपेक्षा आणि विकासाची वचनबद्धता आहे. आपल्या सर्वांची साथ, विश्वास आणि आशीर्वाद मला मिळावा हीच विनंती. विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे प्रेम आणि पाठिंबा हे माझं खरं बळ आहे असे उद्गगार आमदार आवताडे यावेळी पाहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना काढले आहेत.
आपल्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही असे वचन आमदार आवताडे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिला-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.