मंगळवेढा/प्रतिनिधी :-
पावसाळ्याचे दिवस, रिमझिम पाऊस, अधूनमधून ढगांतून डोकावणारी उन्हाची किरणे, संपत आलेल्या सुट्ट्यांमुळे होणारी तगमग पण शाळेत जाऊन पुन्हा जुन्या मित्रांना भेटण्याची या बालमित्रांची उत्सुकता,नवीन दप्तर ,पाठ्यपुस्तकांची रेलचेल ,ओसंडून जाणारा आनंद आणि बरेच काही...
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शनिवार पासून सुरु झालेल्या शाळांमध्ये दाखल झालेल्या बालगोपाळ स्वागतोत्सव सोहळ्याप्रसंगी मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ येथील या जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचे मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी स्वतः बैलगाडीतून सारथ्य करत मिरवणूक काढून त्यांना शाळेत दाखल करत स्वागत केले.
यावेळी अनुभवलेले हे क्षण बालपणीच्या आठवणींना नव्याने जागे करणारे ठरले. तसेच या मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस पण औत्सुक्याचे भाव टिपताना उपस्थितांचे मन अक्षरशः भरून आले.
सदरप्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी विद्यार्थी गोपाळांना सोबत घेऊन बैलगाडीमध्ये शाळेपर्यंत सफर केली. उज्वल देशाच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या या विद्यार्थी गोपाळांना चांगले शिक्षण देऊन जगाच्या स्पर्धेसाठी उभे करा असा आशावाद आमदार आवताडे यांनी व्यक्त केला. आजच्या या किलबिल दिनानिमित्त मला माझे प्राथमिक शाळेतील अनेक रंजक आणि आनंददायी दिवस मला पुनःश्च अनुभवयास मिळाल्याचे प्रतिपादन आमदार आवताडे यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, गटविकास अधिकारी योगेश कदम, गटशिक्षणाधिकारी डॉ. बिभिषण रणदिवे, बायडाबाई राजेंद्र मदने, संतोष कलुबर्मे सुधीर बिले, बाबासो बिले दत्तात्रय इंगळे, साहेबराव शिंदे, प्रकाश पवार, माणिक पवार, दत्ता बिले, रावसाहेब बिले, रंगनाथ कलुबर्मे, डॉ.सुभाष देशमुख, साहेबराव इंगवले, मुख्याध्यापक पटेल तसेच सामाजिक व राजकीय कार्यक्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.