भविष्यात उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा
मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आता या भूमीत हरीतवृक्ष भूमी म्हणून नवीन ओळख निर्माण करण्यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी योगेश कदम व शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ. प्रियदर्शनी महाडिक यांनी दि.21 जून रोजी कृष्ण तलाव परिसरात दहा हजार वृक्ष लागवड करून भविष्यात तो जोपासण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यंदाच्या उन्हाळी हंगामात सोलापूर जिल्ह्याचे तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहचल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला असून या उष्णतेचा भयानक त्रास सोसावा लागला आहे. या घटनेला मानव जबाबदार असून मानवांनी जंगले तोडल्यामुळे निसर्गाने आपली दैनिक क्रिया बदलली असून त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. भविष्यात 50 अंश सेल्सिअशापर्यंत तापमान जाण्याचा अंदाज वर्तविला जात असून ही धोक्याची घंटा असल्याचे निसर्गप्रेमींचे मत आहे. याला अटकाव करण्यासाठी वृक्ष लागवड करणे हा महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुला-मुलींना,नागरिकांनी आपल्या घराभोवती,शेतामध्ये मोकळ्या मैदानात,शाळेच्या परिसरात व अन्य ठिकाणी वृक्ष लागवड केल्यास भविष्यात वाढणारे तापमान कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान याचा सारासार विचार करून गटविकास अधिकारी योगेश कदम व शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ. प्रियदर्शनी महाडिक यांनी कृष्ण तलाव लगत असलेल्या मोकळ्या जागेत व पाण्याच्या ठिकाणी दि.21 जून रोजी वटपौर्णिमा दिवशी जवळपास दहा हजार रोपांच्या लागवडीचे नियोजन केले आहे.प्रत्येक महिलेने वडाच्या झाडाला फेऱ्या मारून एक वृक्ष लावल्यास हजारो वृक्ष तयार होतील.
यामध्ये करंजी, ऑक्सिजन मिळणारे वृक्ष,पिंपळ,कडुलिंब ,चिंच, बांबू या व अन्य वृक्षाची लागवड केली जाणार आहे. याचे भविष्यातील संगोपनही महत्त्वाचे असून त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. उन्हाळ्यात वृक्षांना पाणी गरजेचे असल्यामुळे यावेळी ठिबकच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जाणार आहे. या कार्यक्रमात महिलांनी आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवून मंगळवेढा भूमीला हरित वृक्ष भूमी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन डॉ. प्रियदर्शनी महाडिक यांनी केले आहे.