मंगळवेढा/प्रतिनिधी -
भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देश व जागतिक पातळीवरील नेतृत्व गतिमान करण्यासाठी लोकसभा उमेदवार राम सातपुते यांच्या पाठीमागे मतदानाच्या रूपाने मोठी ताकद उभा करू आणि मोठ्या मताधिक्याने यांच्या विजयाचा गुलाल उधळू असा विश्वास आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला आहे.सोलापूर लोकसभेचे भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मंगळवेढा येथे बूथ प्रमुख, सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्रप्रमुख व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बुथ संमेलन व कार्यकर्ता मेळावा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी हे मत व्यक्त केले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभ भाजपा स्थापना दिनाच्या निमित्ताने भारत माता, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्यय यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा स्थापना दिनाचे औचित्य साधून मतदार संघातील ज्येष्ठ भाजपा पदाधिकाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिगंबर यादव यांनी केले. यावेळी भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय जमदाडे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी उपसभापती विजयसिंह देशमुख, जिल्हा सचिव संतोष मोगले, उपाध्यक्ष सिद्धेश्वर कोकरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव आदींनी आपली मनोगत व्यक्त करून महायुती विचारांचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
राज्यातील सर्वसमावेशक सामाजिक आणि राजकीय कार्य नेतृत्वाचा धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलणारे नेतृत्व म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचा राज्याच्या राजकारणातील वावर नेहमीच अधोरेखित केला जातो. आपला लोकसभा व विधानसभा मतदारसंघ भरघोस निधीच्या रूपाने सुजलाम सुफलाम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये मतदानाच्या रूपाने आणि आमदार राम सातपुते यांच्या विजयाने आणखी भक्कम करण्याचा निर्धार माजी पालक मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी यावेळी व्यक्त केला.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या विचारांच्या पाठीशी राहिला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच विक्रमी मताधिक्य मिळेल यात तिळमात्र शंका नाही असा विश्वास आमदार आवताडे यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील भाजपा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर इतर नागरिक आणि महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. सर्वात शेवटी माजी तालुकाध्यक्ष सुनील करंदीकर यांनी सर्वांच्या आभार मानले.