श्रावण भक्तीचा जागर बोराळे च्या महिला भगिनी निघणार अष्टविनायक दर्शनाला...


श्रावण भक्तीचा जागर बोराळे च्या महिला भगिनी निघणार अष्टविनायक दर्शनाला...

मंगळवेढा/ प्रतिनिधी :-

पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे यांच्या पुढाकाराने भव्य अष्टविनायक दर्शन यात्रा महिला भगिनी मध्ये उत्साहाचे वातावरण श्रावण महिन्याच्या पावन पर्वाचा आध्यात्मिक आनंद द्विगुणीत करण्यासाठी बोराळे गणातील महिला भगिनींसाठी पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे यांच्या पुढाकाराने भव्य अष्टविनायक दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

भक्ती, अध्यात्म, संस्कृती, निसर्ग आणि महिला एकतेचा सुंदर संगम घडविणाऱ्या या यात्रेबाबत महिला भगिनींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  "गणरायाच्या चरणी भक्तीचा धागा आणि महिला भगिनींच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य"या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेत श्री गणरायाच्या आठ पवित्र स्थानाचे दर्शन घेण्याची संधी महिला भगिनींना मिळणार आहे. तीन दिवसाच्या या भक्तीमय प्रवासात महिला भगिनींना अध्यात्मिक समाधाना सोबतच एकमेकींसोबत आनंदाचे क्षण अनुभवता येणार आहे. 

दिनांक 19 ऑगस्ट च्या रात्री व 20 ऑगस्ट च्या पहाटे यात्रेला प्रारंभ होणार असून पहाटे साधारण दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान बोराळे येथील महादेवी महिला पतसंस्थेच्या कार्यालयासमोरून बस रवाना होणार आहेत. यात्रेसाठी नाव नोंदविलेल्या सर्व महिला भगिनींनी वेळेपूर्वी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

  या यात्रेदरम्यान 20 ऑगस्ट रोजी ओझर येथे आणि 21 ऑगस्ट रोजी पाली येथे मुक्काम करण्यात येणार आहे.महिला भगिनींच्या सोयीचा विचार करून भोजन, नाश्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रावण निमित्त उपवास असणाऱ्या भगिनींसाठी उपवासाच्या पदार्थाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

  सध्या पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता महिला भगिनींनी छत्री, उबदार पांघरून, आवश्यक कपडे, पाण्याची बाटली तसेच नियमित औषधे सोबत ठेवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान सर्वांनी शिस्त, सुरक्षितता आणि परस्पर सहकार्याला प्राधान्य द्यावे असेही आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. 

अष्टविनायक दर्शन यात्रेसाठी महिला भगिनींच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे यात्रेला विशेष रंगत आली आहे. महिला एकतेचा संदेश देणारी ही यात्रा केवळ धार्मिक दर्शनाची नसून महिला भगिनींना एकत्र आणणारी परस्परांमध्ये स्नेह व आपुलकी वाढविणारे आणि सामाजिक एकतेला बळ देणारी यात्रा ठरणार आहे. प्रवासादरम्यान प्रत्येक भगिनीने स्वतःची व एकमेकींची काळजी घ्यावी. ग्रुप पासून कोणीही वेगळे होऊ नये आणि वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

 बोराळे गणातील महिला भगिनींना श्रावण महिन्यात श्री अष्टविनायकाचे मनोभावे दर्शन घडावे त्यांच्या जीवनात भक्ती ,आनंदाने सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी तसेच सर्व भगिनींनी एकत्र येऊन आनंदाचे अविस्मरणीय क्षण अनुभवावेत या उद्देशाने या यात्रेची आयोजन केले आहे महिलांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद हाच या उपक्रमाचा खरा आनंद आहे अशी भावना पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे यांनी व्यक्त केली. 

श्रावणातील भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया! च्या जयघोषात सुरू होणाऱ्या या अष्टविनायक दर्शन यात्रेकडे बोराळे परिसरातील महिला भगिनींचे लक्ष लागले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.