जिल्हा परिषद सदस्या करुणा शिवशरण यांच्या संकल्पनेतून दिसणार सेवाभावी पांडुरंग...
मंगळवेढा (प्रतिनिधी) :-
राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद लक्ष्मीदहिवडी गटाच्या सदस्या करुणा जनार्धन शिवशरण यांच्या संकल्पनेतून व लक्ष्मी दहिवडी पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गट यांच्या सौजन्याने येत्या बुधवार दिनांक २२ जुलै रोजी सकाळी ९.०० वाजलेपासून जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आंधळगाव येथे महारक्तदान संकल्प वारकऱ्यांच्या सेवेसाठी हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक जनार्धन शिवशरण यांनी दिली आहे.
आषाढ एकादशी वारीचे पर्व म्हणजे आध्यात्मिक आणि सांप्रदायिक विचार मूल्यांचा मोठा उत्सव असतो. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शेकडो किलोमीटर अंतर पार करून विविध पालख्यांच्या समवेत पंढरीच्या पांडुरंग-रखुमाई भेटीला येणाऱ्या तसेच वारीनिमित्त पंढरीत दाखल झालेल्या वारकरी भक्तांना आरोग्य विषयक रक्ताची समस्या निर्माण झाली तर रक्ताचा कोणताही तुटवडा भासू नये यासाठी जिल्हा परिषद सदस्या करुणा शिवशरण यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या महारक्तदान शिबिरातून खऱ्या अर्थाने सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन होणार असल्याची भावना जिल्हा परिषद लक्ष्मी दहिवडी गटातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या लोककल्याणकारी विकासाची कावड आपल्या खांद्यावर घेऊन सर्वात जास्त दिवस मुख्यमंत्री पदावर विराजमान असणारे मुख्यमंत्री असा विक्रम साधणारे मुख्यमंत्री ना.फडणवीस यांना या आगळ्यावेगळ्या विधायक उपक्रमांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचा संकल्प सामाजिक दायित्व अधोरेखित करणारा आहे. तरी या महारक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होत रक्तदान करून सामाजिक बांधिलकीसाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.