मंगळवेढा शहरानजीक दामाजी नगर हद्दीत घरफोडी, सोने व रोकड रक्कम जबरदस्तीने लुटले ; त्या जबरी चोरीच्या घटनेनंतर भितीपोटी कुटूंबिय गेले बाहेरगावी...


मंगळवेढा शहरानजीक दामाजी नगर हद्दीत घरफोडी, सोने व रोख रक्कम जबरदस्तीने लुटले...

त्या जबरी चोरीच्या घटनेनंतर भितीपोटी कुटूंबिय गेले बाहेरगावी...

मंगळवेढा /प्रतिनिधी :-

 मंगळवेढा शहरानजीक असलेल्या दामाजीनगर हद्दीत घरफोडी झाल्यानंतर कुटूंबिय भितीपोटी बाहेरगावी निघून गेले. दरम्यान चोरट्यांनी कुटूंबियांना चाकूचा धाक दाखवून सोने व रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याने ते कुटूंब भेदरले आहे. तसेच या परिसरात अन्य दोन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे.

दि.17 मार्च रोजी यातील फिर्यादी अश्विनी हजारे व त्यांचा 11 वर्षाचा मुलगा जेवणखाण करुन रात्री झोपी गेले होते. रात्री 2 ते 2.15 च्या दरम्यान तिघा चोरट्यांनी बंगल्याचे गेट उघडून आत प्रवेश केला. घराच्या मुख्य दरवाज्याच्या आतील कडी कोयंडा उचकटून त्यांनी प्रवेश करुन 11 वर्षाच्या मुलाला टॉमी मारुन उठविले. मुलाच्या ओरडण्यामुळे आई जागी झाली. या दोघांना तिघा चोरट्यांनी लांब लचक आणलेल्या मोठ्या चाकूचा धाक दाखवून पैसे व सोने कुठे ठेवले आहे सांगा म्हणाले. यावेळी फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून 9 गॅ्रम सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने चोरटयांनी ओरबडून घेतले. यावेळी चोरट्यांनी फिर्यादीस व तिच्या मुलास आवाज कराल तर याद राखा अशी धमकीही दिली.

 तसेच फिर्यादी ह्या मोलमजुरी शेतावर करुन उपजिवीका जगत असल्याने इतर 10 महिलांचा रोजगार 4 हजार 500 त्यांच्याकडे होता. हे रोजगाराचे पैसे उशी खाली ठेवून फिर्यादी झोपल्या होत्या. या पैशावर ही चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून कानटोप्या घातल्या होत्या त्या चॉकलेटी कलरच्या होत्या. अंगात बनियन व नाईट पँट असा पोशाख परिधान केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या जबरदस्तीच्या चोरीच्या घटनेमुळे या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

 फिर्यादी चक्क भितीपोटी आपल्या मुलासह घराला कुलूप लावून चार दिवस बाहेरगावी निघून गेले होते. पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी पोलीस व्हॅन फिरवून या परिसरातील नागरिकांना भयमुक्त करुन त्यांना दिलासा दयावा अशी मागणी होत आहे. पोलीसांना ही चोरी उघड करणे अधिक महत्वाचे असून तरच चोरट्यावर पोलीसांचा जरब बसणार असल्याच्या प्रतिक्रीया या परिसरातील नागरिकाकडून व्यक्त होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.