विकासाचा लाभ ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी निवडणूक रिंगणात -करुणा शिवशरण ; गावभेटी, थेट संवादाच्या माध्यमातून मतदारांशी साधला संपर्क...

विकासाचा लाभ ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी निवडणूक रिंगणात -करुणा शिवशरण 

गावभेटी, थेट संवादाच्या माध्यमातून मतदारांशी साधला संपर्क...

मंगळवेढा /प्रतिनिधी :-

 कोणतीही निवडणूक ही केवळ पदासाठी नसून जनतेच्या आणि त्या भागातील परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी असते. भाजपाचा विचार हा विकास कामे करणारा विचार आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने विकासाची मजबूत पायाभरणी केली असून, त्याचा लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद लक्ष्मी दहिवडी गटातून आपण निवडणूक रिंगणात असल्याचे प्रतिपादन या गटाच्या उमेदवार करुणा जनार्धन शिवशरण यांनी व्यक्त केले आहे.

भाजपचे विकासात्मक धोरण, प्रधानमंत्री आवास योजना,जलजीवन मिशन, रस्ते व पायाभूत सुविधा तसेच आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील योजनांची माहिती देणे हे माझ्या जनसेवेचे एकमेव सूत्र आहे. त्यामुळे या योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी आवश्यक आहे त्यासाठी आपण लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटात भाजपच्या प्रचार मोहिमेत आता वेग आला असून पक्षाच्या अधिकृत उमेदवार करुणा शिवशरण यांनी गाव भेट व थेट संवादाच्या माध्यमातून प्रचाराची दिशा स्पष्ट केली आहे. मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत विकासाचा ठाम अजेंडा मांडल्याने संपूर्ण गटात राजकीय वातावरण भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने सकारात्मक बनले आहे. 

 करुणा शिवशरण या दररोज विविध गावांमध्ये भेटी देत नागरिकांच्या घरी जाऊन संवाद साधत आहेत रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, सेवा, शाळा अंगणवाड्या शेती व रोजगार यासारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांनी आपल्या अपेक्षा मांडल्या आहेत. 

भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर विश्वास व्यक्त करत उमेदवार शिवशरण यांनी सांगितले की, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांचे अनुभवी नेतृत्व, भाजपा कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि लक्ष्मी दहिवडी गटातील जनतेशी माझा असणारा थेट संवाद हीच माझ्या उमेदवारीची खरी ताकद आहे. 

नागरिकांचा विश्वास आणि पाठींबा मिळत असल्याने विकासाच्या लढाईत आम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गावभेट दरम्यान भाजपचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवार करून शिवशरण यांनी प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे त्यांच्या प्रचाराला सर्व स्तरातून अभूत पूर्व प्रतिसाद मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.