जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार शुभारंभ उत्साहात संपन्न
मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेली व नियोजित असलेली प्रचंड विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवून विरोधकांची बिनबुडाचे खोडून काढून त्यांना निवडणुकीमध्ये चारी मुंड्या चित करून जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभ्या असलेल्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार समाधान आवताडे व युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर देवस्थान माचनूर येथे करण्यात आला.
त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेप्रसंगी उपस्थित मतदार बंधू भगिनींना संबोधित करत असताना त्यांनी हे प्रतिपादन केले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, विकासाची कोणतेही व्हिजन समोर न ठेवता केवळ भावनिक राजकारण करून आतापर्यंत विरोधकांनी आपली पोळी भाजून घेतली आहे, परंतु यापुढे समाधान आवताडे यांना विकासाच्या बाबतीत प्रतिआव्हान देताना खोलवर विचार केला पाहिजे. कारण मी माझ्या आमदारकीच्या कालखंडात ऐतिहासिक निधी आणून समाजातील सर्व स्तरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे.
पंढरपूर मंगळवेढा ही संत विचारांची मौलिक विचारधारा जतन करणारी भूमी म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये परिचित आहे. अशा विचारप्रगल्भ मतदारसंघांमध्ये राजकीय दृष्टिकोनातून कोण जर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असेल तर त्यांना त्याच पद्धतीने जशास तसे उत्तर या पुढील काळामध्ये दिले जाईल असा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला आहे. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी 3000 कोटीच काय पण तीस हजार कोटी जरी निधी आला तरीही आपली विकासाची भूक भागणार नसल्यामुळे खर्च झालेल्या व मंजूर असलेल्या निधीवर बोलण्याचा अधिकार फक्त जनतेला आहे विकासाच्या बाबतीमध्ये पोपटपंची करणाऱ्याला नाही असे नमूद करून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून विकास गंगेला आणखी कधी देण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रणव परिचारक महादेव सावकार, औदुंबर वाडदेकर, विष्णुपंत आवताडे, उपनगराध्यक्ष येताळा भगत भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, प्रकाश गायकवाड, अजित जगताप, तानाजी पाटील, गौरीशंकर बुरकूल, चंद्रकांत घुले, प्रवीण खवतोडे, सोमनाथ आवताडे, तानाजी पाटील, बापूराव चौगुले, काशिनाथ पाटील, गौडाप्पा बिराजदार, शिवाजी पटाप, राजन पाटील, सरोज काझी, फिरोज मुलाणी, आझाद पटेल, बाबा कोंडूभैरी, नितीन मेटकरी, विनोद पाटील, नामदेव जानकर तम्मा चौगुले, काका मिसकर, विजयसिंह पाटील, सुधाकर मासाळ, ईश्वर गडदे, गुलाब थोरबोले, मंगेश मोरे, नितीन पाटील, अनिल पाटील, धनाजी बिचुकुले, पांडुरंग भाकरे, संतोष लेंडवे, भिमराव मोरे आदीजण तसेच तालुक्यातील विविध गावांचे सरपंच उपसरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य मतदार बंधू-भगिनी आणि नागरिक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी युवक नेते प्रणव परिचारक यांनीही बोलताना सांगितले की, जनतेचा सर्वांगीण विकास हे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख विजन असल्यामुळे आपल्या मतदारसंघात विकासाच्या पर्वाला आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारकयांच्या नेतृत्वाखाली आणखी भक्कम करण्यासाठी आपण विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून राजकारण करणाऱ्या मंडळींना साथ दिली पाहिजे त्यासाठी भारतीय जनता पार्टी हा आपणा सर्वांसाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राजकीय संस्कृतीची कोणतीही नैतिकता नसलेल्या विरोधी पक्षांकडून बेताल आणि खालच्या पातळीची वक्तव्य केली जातात ही त्यांच्या नेतृत्वाची पातळी स्पष्ट करते अशी जहरी टीकाही त्यांनी यावेळी केली.