मंगळवेढा / प्रतिनिधी-
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यातील पायाभूत सुविधांची पूर्तता आणि आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा, आरोग्य, वीज, रस्ते-विकास, शिक्षण, कृषी, घरकुल योजना, विहीर योजना तसेच पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या सर्व शासकीय योजना तसेच तालुक्यातील प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या सुविधांसंदर्भात सखोल चर्चा आणि प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश आणि आढावा घेण्यासंदर्भात मतदारसंघांचे आमदार आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांच्यावतीने देण्यात आली आहे.
सदर बैठक शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आली.
या आढावा बैठकीमध्ये तालुक्यातील सर्वच पंचायत समितीच्या गणातील नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासकीय कामातील समस्या सोडवण्यासाठी आमदार आवताडे यांच्या माध्यमातून आढावा घेतला जाणार आहे.
त्यामुळे या बैठकीसाठी ज्या नागरिकांच्या अडी-अडचणी असतील तर त्यांनी आपल्या मागण्या व समस्या लेखी स्वरूपात गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६ पर्यत आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे जमा कराव्यात असेही आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीसाठी पंचायत समितीचे बीडीओ, पाणीपुरवठा अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, घरकुल विभागाचे अधिकारी, पंचायत समिती विविध शासकीय योजना अनुदान यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी या बैठकीसाठी मंगळवेढा तालुका पंचायत समिती सर्व गणातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार जनसंपर्क कार्यालय यांच्यावतीने करण्यात आले आहे.