शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सिद्धेश्वर हेंबाडे यांचा दावा...
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठच्या दुष्काळी भागात उजनीच्या उजव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तनाची दुसरी पाण्याची पाळी केवळ माण नदी पाणी संघर्ष समिती व शेतकरी संघटनेने निवेदन देणे, आंदोलन करणे, रस्ता रोको करणे यामुळे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांना पाणी सोडण्याबाबत मांडलेल्या आग्रही भूमिकेमुळे मान नदीत पाणी आले आहे .
या पाण्याचे श्रेय खासदार प्रणिती शिंदे यांनी घेऊ नये असा टोला शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सिद्धेश्वर हेंबाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे.
केवळ जिल्हाधिकाऱ्यांना, अधीक्षक अभियंतांना खासदारांनी सांगितले म्हणून पाणी आल्याचा दावा करणे हा प्रकार हास्यास्पद आहे.आम्ही माण नदी पाणी संघर्ष समिती यांनी केलेल्या आंदोलनामुळे माण नदीत पाणी आले आहे. सदर आंदोलन शेतकऱ्यांनी रितसर अगोदर प्रशासनाला निवेदन देऊन नोटीस देऊन मुदत दिली होती.तरी या माण नदी पाणी संघर्ष समिती शेतकऱ्यांवर या आंदोलनामुळे पोलिस प्रशासनाने जमावबंदीचा आदेश दाखवून गोरगरीब शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी स्थानिक नेत्यांनी, पुढाऱ्यांनी प्रयत्न करून श्रेय घ्यावे.
माण नदीत पाणी सोडण्याबाबत आम्ही पाणी संघर्ष समिती,शेतकरी संघटनेने शासकीय कार्यालयात निवेदन दिली होती व निवेदन देऊन पाठपुरावा करून डावा कालवा उजवा कालवा याप्रमाणे पाणी दिले जात असताना माण नदीत पाणी दिले गेले आहे.यामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांचा तिळा इतका देखील प्रयत्न नाही.
उजनी कालव्याचे सिंचन आवर्तन हे उपलब्ध पाणी साठ्यानुसार नियोजित करण्यात येते व त्यानुसार माण नदीत ,कालव्याचे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध पाणी साठ्यानुसार सिंचन आवर्तन करण्यात येते. मान नदीत पाणी सोडणे बाबत दिनांक १५ मे २०२६ रोजी आमदार समाधान आवताडे यांना माणनदी काठावरील शेतकरी व माण नदी पाणी संघर्ष समिती निवेदन देऊन भेटायला गेल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी सातत्याने अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांना मोबाईल फोन वरून संपर्क साधून पाणी सोडण्यास सांगितले.माण नदी पाणी संघर्ष समिती त्यावेळी त्यांना कालव्याचे आवर्तन झाल्यानंतर मान नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
दिनांक २५/ ०५/ २०२६ व २७/ ०५/२०२६ रोजी संबंधित मान नदी काठावरील शेतकरी विभागीय कार्यालयास निवेदन घेऊन आले असता त्यांना या कार्यालयाने माण नदीत पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू असल्याचे तसेच उपलब्ध विसर्गानुसार माण नदीवरील सर्व बंधारेत पाणी सोडण्यात येईल असे लेखी त्यांच्या निवेदनाला दिले आहे.
तशा प्रकारची पाणी सोडण्याची कारवाई दिनांक २५ मे २०२६ पासून उपलब्ध विसर्गानुसार सुरू केला नसल्यामुळे माण नदी पाणी संघर्ष समिती यांनी दिलेल्या निवेदनानुसार दिनांक ०२/०६/२०२६ रोजी मंगळवेढा-पंढरपूर रोडवर मल्लेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन केले. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी या रास्ता रोको आंदोलनाची दखल घेऊन माण नदीमध्ये विसर्ग वाढविण्यात आलेला आहे.सद्यस्थितीत पाणी धर्मगाव बंधारे मधून मुढवी बंधारेकडे पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मंगळवेढा तालुक्यातील मान नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सर्वच लोकप्रतिनिधींचे उंबरटे झिजवल्यानंतरही मान नदीत पाणी येण्याच्या अशा धुसर झाल्या होत्या त्यामुळे "मान नदी पाणी संघर्ष समिती" स्थापन करून नदीकाठच्या सर्व गावच्या शेतकऱ्यांनी 2 जून रोजी पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर ठिय्या मांडला व सुमारे तीन तास रस्ता रोको केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पूर्ण दाबाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे हा पाणी सोडण्याच्या निर्णयाचे श्रेय फक्त आणि फक्त मान नदी संघर्ष समितीचे आहे. दोन दिवसापासून मीडियामधून काही लोकप्रतिनिधी माझ्यामुळे नदीत पाणी सुटले असा ऊर बडवून घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र फुकटच श्रेय घेण्यासाठी कुणी आटापिटा करू नये असा घनघात शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर हेंबाडे यांनी केला आहे.
यंदा उजनी 110 टक्के भरून अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे पाण्याचे नियोजन व्यवस्थित झाले नाही त्यामुळे पाणी सोडण्यास अधिकारी टाळाटाळ करीत होते आम्ही मान नदी संघर्ष समितीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या लोकप्रतिनिधींच्याही भेटी घेऊन मान नदीमध्ये पाणी सोडण्याच्या विनंती केल्या मात्र सोडतो सोडतो म्हणून अधिकारी दिवसेंदिवस टाळाटाळ करीत होते त्यामुळे आम्हाला रस्ता रोको करण्याची वेळ आली.या रास्ता रोको दरम्यान संजय पवार (घरनिकी), दीपक जाधव (सिद्धेवाडी),बबन रोकडे (मुढवी), विवेक चौगुले (मल्लेवाडी),सिद्धेश्वर मोरे, लक्ष्मण मोरे, सिद्धेश्वर हेंबाडे (ढवळस), मारुती मस्के, आदिनाथ शिंदे (शिरगाव) यांचे सह दहा ते पंधरा अज्ञात लोकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल झाले आहेत.
यावेळी लोकप्रतिनिधी कुठे गेले होते? केवळ लोकप्रियतेसाठी श्रेय घेऊन जन्मत आपले होत नसते आम्हा शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याअगोदर तुम्ही हा प्रश्न मार्गी लावला असता तर श्रेय घेतल्याचे बरे दिसले असते.मात्र आम्ही सर्व शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे अधिकाऱ्यांनी पाणी सोडले असून हे यश केवळ पाणी संघर्ष समितीचे आहे. त्यामुळे कोणीही माझ्यामुळे पाणी सुटले म्हणून श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा घनाघात शेतकरी नेते सिद्धेश्वर हेंबाडे यांनी केला आहे.