आमदार समाधानदादा आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न...
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मारापुर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मागासवर्गीय कुटुंबीयांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करून त्यांच्या जीवनमान उंचावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी पार पडला.
ग्रामनिधीतून उपलब्ध करून देण्यात आलेले साहित्य मारापुरचे सरपंच तथा मंगळवेढा पंचायत समिती सदस्य विनायक यादव यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
यावेळी बोलताना सरपंच विनायक यादव यांनी सांगितले की, “गावातील मागासवर्गीय कुटुंबांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील राहील. गरजू कुटुंबांना दैनंदिन जीवनात मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.” तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून भविष्यात विविध शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
विनायक यादव यांनी यापूर्वीही ग्रामनिधीतून दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च करून मदतीचा हात दिला असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास हा ग्रामपंचायतीचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला उपसरपंच आशोक आसबे, ग्रामविकास अधिकारी महादेव भुसे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजकुमार यादव, ग्रामपंचायत सदस्य चैतन्य सातपुते, बाळासाहेब वाघमारे, सिद्धनाथ माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.