मरवडे फेस्टीव्हलला आजपासून आरंभ ; छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे फेस्टीव्हल सोहळ्याचे आयोजन...

मरवडे फेस्टीव्हलला आजपासून आरंभ...

छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे फेस्टीव्हल सोहळ्याचे आयोजन... 

मंगळवेढा /प्रतिनिधी :-

कुस्तीच्या आखाड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मरवडे गावयात्रेला जोडूनच छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे फेस्टीव्हल सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाचा हा सोहळा दि. ७ ते ११ मार्च या कालावधीत संपन्न होणार असून या निमित्ताने भरगच्च सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक सुरेश पवार यांनी दिली.
             मागील २५ वर्षांपासून मरवडे फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येते. संपूर्ण महाराष्ट्रांतील कलावंतांचे माहेरघर म्हणून मरवडे फेस्टीव्हलची ओळख राज्यात निर्माण झाली असून या व्यासपीठावर आजवर शेकडो कलावंतांना सादरीकरणाची संधी मिळाली आहे. शनिवार दि. ७ मार्च रोजी मरवडे फेस्टीव्हलचा उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर होणाऱ्या कवी संमेलनासाठी महाराष्ट्रातील नामवंत कवींना निमंत्रण करण्यात आले आहे. यंदाच्या संमेलनासाठी दंगलकार नितीन चंदनशिवे, गुंजन पाटील, लता ऐवळे, प्रा.रोहीत शिंगे, इंद्रजित घुले, प्रा. रोहित देशमुख, वर्षा चौगुले, बदिउजमा बिराजदार, अँड. महादेव कांबळे, शिवाजी सातपुते, सुर्याजी भोसले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 
      रविवार दि. ८ रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते प्रा.नितीन बानगुडे - पाटील यांचे जाणता राजा शिवछत्रपती या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे तिसरे पुष्प वाशिम येथील प्रसिद्ध प्रबोधनकार पंकजपाल महाराज हे दि. ९ मार्च रोजी गुंफणार आहेत. सामाजिक व्यंगावर प्रहार करणारा हा कार्यक्रम सप्तखंजिरी वादनाने अधिक रंगतदार ठरणार आहे. दि. १० मार्च रोजी राम चौधरी निर्मित मराठमोळ्या लावण्या व आयटम साँगचा लावण्यरंग हा कार्यक्रम संपन्न होईल.

       पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सांगता बुधवार दि. ११ मार्च रोजी होणार असून मरवडे फेस्टीव्हलच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या संपूर्ण सोहळ्याची सांगता कोल्हापूर येथील माऊली संगीत सोंगी कलापथकाच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाने होणार आहे. 

         तरी या कार्यक्रमांचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे पदाधिकारी रावसाहेब सुर्यवंशी, राजेश कुलकर्णी, सर्जेराव गणपाटील, अरुण सरडे, रावसाहेब जाधव, नवनाथ जाधव, सिद्धेश्वर रोंगे, विजय पवार, गिरीधर शिवशरण, सागर पवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.