मंगळवेढा शहरात दारुचे सेवन करुन अवजड वाहने चालविणार्या चालकावर वाहतूक पोलीसांची कारवाई...
चालकाविरुध्द गुन्हा दाखल पोलीसांनी वाहन केले जप्त...
मंगळवेढा / प्रतिनिधी :-
मंगळवेढा शहरात अवजड वाहनांना नो एन्ट्री असतानाही भरधाव वेगात अवजड वाहन येत असल्याने दामाजी चौकात वाहतूक शाखेच्या पोलीसांनी थांबवून त्याच्याकडे चौकशी केली असता बोलताना त्याच्या तोंडाचा उग्र वास आल्याने तो दारुच्या नशेत व लोकांच्या जीवीतास धोका निर्माण करुन वाकडे तिकडे वाहन चालवत असल्यात प्रकरणी पोलीसांनी वाहन चालक दिनकर नामदेव गर्जे (वय 54,रा.चटई चाळ,मुंबई) याच्या विरुध्द मोटार वाहन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सुरज साळुंखे,पोलीस हवालदार संभाजी यादव, पोलीस अंमलदार काळेल असे वाहतूक शाखेचे पोलीस पथक शहरातील साठेनगर जवळ वाहतूक केसेस व पेट्रोलिंग करीत असताना मरवडेकडून शहरातील दामाजी चौकाकडे एक चालक त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा ट्रेलर एम.एच.46 ए.आर.7101 हे वाहतूकीच्या चिन्हाचे व नो एन्ट्री फलक असताना त्याचे उल्लंघन करुन भरधाव वेगात वाहन चालवून लोकांच्या जीवीतास धोका निर्माण करुन वाकडे तिकडे चालवीत असताना पोलीसांना मिळून आला.
वाहतूक शाखेच्या पोलीसांनी तात्काळ दखल घेवून अवजड वाहन अडवून त्याचे नाव व पत्ता सांगताना तोंडाचा अंबट उग्र घाण वास आल्याने तो दारुची अंमलाखाली असल्याचा संशय पोलीसांना आल्याने त्या ट्रक चालकाचे ब्रेथअॅनालाईझर मशिनने तपासणी केली असता त्याची टेस्ट 3.36 वाजता पॉझीटीव्ह आली त्यामध्ये 151.7 मिली पॉझीटीव्ह प्रमाण दिसून आले असल्याचे दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. दरम्यान शहरामध्ये पंढरपूर बायपास रोड व मरवडे रोड येथे वाहतूक शाखेच्या पोलीसांनी बॅरीकेट व नो एन्ट्रीचे फलक लावले असतानाही बेधडक ऊसाची भरलेली वाहने व अवजड वाहने शहरामध्ये प्रवेश करीत असल्याचे विदारक चित्र आहे. ही अवजड वाहने रोखण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलीसांना मंगळवेढा नगर परिषदेचे नो एन्ट्रीचे पत्र मिळणे गरजेचे आहे.
मात्र मुख्याधिकारी तथा नगरपरिषद याकडे गांभीर्यपुर्वक पाहत नसल्याने उद्या एखाद्यााचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास नेमके कोणाला जबाबदार धरायचे असा संतापजनक सवालही शहरवासीयामधून विचारला जात आहे. त्यासाठी नगरपरिषदेने पोलीस प्रशासनास नो एन्ट्रीचे पत्र तात्काळ देणे गरजेचे आहे अन्यथा दुर्घटना झाल्यानंतर याला सर्वस्वी नगपरिषद जबाबदार राहील अशा प्रतिक्रीया नागरिकामधून आजच्या घटनेवरुन व्यक्त होत आहे.